अर्थच चुकलाय स्वातंत्रयाचा
अर्थच चुकलाय स्वातंत्रयाचा
सोसलीय तीने झळ
अन् अनुभवलाय
दुःस्वप्नातला अंगार
प्रयत्नांची शर्थ करूनही
पडताच आले नाही तिला बाहेर
आंजारू - गोंजारून,
मायाळुपणे,
तर कधी एकांताच्या बंद मुठीत
दडपून टाकलेलं तिचं अस्तित्व
कधी मिटल्या डोळ्यातून ओघळले, तर
कधी हुंदक्यात दाटून राहिले
कानठळ्या बसवतोय
घुसमटीचा तीव्र ध्वनी
हुंदक्याचा, रडण्याचा
आवाज घुमतोय सर्वत्र
प्रेमाची गरळ ओकणाऱ्या
त्याची प्रचंड शिसारी, किळस
अन् भिती बसलीय मनात
प्रत्येक श्वास सांगु लागलाय
नकोय स्वातंत्र्य मला,
कारण अर्थच चुकला
माझा स्वातंत्र्याचा
स्वैर जगले
स्वातंत्र्याच्या नावाखाली
जग आभासीच होते
दिसत होते दिवास्वप्न
जे हवेतच विरले
आज अशी मी मरणासन्न
विझेल ज्योत या देहाची
पण कधीच न व्हावी यापुढे
कहाणी एका श्रध्दाची
