सासर झालं माहेर
सासर झालं माहेर
सासर झालं माहेर
कन्या एकुलती एक, माहेरी वाढले लाडात।
माहेरीच्या सुखामध्ये, कधी नव्हती ददात॥
प्रेमविवाह करून, आले नांदाया सासरी।
रोष ओढवून घेई, लाडकी कन्या माहेरी॥
लेकीच्याच सुखासाठी, मायबाप रागवती॥
परी लेकीचेही मन, का न समजून घेती॥
दु:खित होऊन मनी, त्यजिले मी माहेराला।
करता गृहप्रवेश, सासरी जीव लावला॥
शंका होती मनामध्ये, वाटेन का मी आपली।
बहरेल का मातीत, वेल नव्याने लावली॥
झाले दारात स्वागत, औक्षणास सासूबाई।
घेऊन मिठीत मला, म्हणती मीच तुझी आई॥
नको मनामध्ये शंका, नको करू खंत मनी।
नको मानू हे सासर, लेक आमुची तू गुणी॥
कधी वाटले भेटावे, तुझ्या आईबाबांनाही।
ठेव डोके मांडीवर, घाल मिठी गळ्यालाही॥
नको आम्हां सूनबाई, एक मागणे देवाला।
लेक नाही दिली पोटी, ठेव सुखी ह्या लेकीला॥
ऐकून त्यांचे वचन, आले माझ्या डोळां पाणी।
" सासर झालं माहेर " , जाणीव ही मनोमनी ।
