बंगल्यातील भूत
बंगल्यातील भूत
माळावरच्या ओसाड बंगल्यात एक भूत दडले आहे
अमावास्येच्या काळ्या रात्री तिथे प्रकाशरेखा चमकत राहे
गावामध्ये उठली आवई मध्यरात्रीला पडघम वाजे
बंगल्याची म्हातारी मालकीण भूत बनुनी अंगणात गर्जे
पोरेबाळे घाबरून राहती, कुणी न बंगल्याकडे फिरकती
अंधा-या रात्री काळोखात पण बंगल्यामध्ये विजा चमकती
अशातच गावामध्ये शास्त्रज्ञ, येऊन वदला, "भूतप्रेत सारे खोटे "
विज्ञानाची धरा कास , अन् शोधून काढा रहस्य मोठे
गावामधली तरुण पोरे घेऊन आपल्या मदतीसाठी
शोध लावीन मी सत्याचा, मनामध्ये बांधी तो खूणगाठी
पोलीस पाटील गावामधले समजावू लागले तयाला
अंधश्रद्धा नसे ही बरं का, अनुभवाने येईल पडताळा
तरुण वैज्ञानिक असे तो, विरोधाने थोडाच थांबतो?
संशोधन करण्याचा निश्चय भूतबाधेला मुळी न डरतो.
जिल्ह्याच्या गावी जाऊन त्याने समजावले जिल्हाधिका-याला
परी दुर्दैव त्याच्या गाडीला, गावी परतता अपघाती मृत्यू झाला
लोक बोलले, "पहा कशी ही भुताने करणी केली,
लग्नाआधीच झपाटून त्याची यमसदनी रवानगी झाली!"
भूताने कल्लोळ माजवला, आता प्रकटते केव्हाही रात्रीला
गावकरी जन भिऊन वागती,नको उगा कोणाचा बळी घ्यायाला
परी एके दिवशी अवचित घडले; सरकारी गाड्या लालबत्तीच्या
एकामागून एक प्रवेशती, पोलीस अन् जिल्हाधिकारी वर्गाच्या
पोलीस पाटील गावामधले लगबगीने सामोरे जाती त्यांना
इन्स्पेक्टर देसाई ऑर्डर देती, "पकडून ब
ेड्या ठोका ह्यांना!
माळ्यावरच्या बंगल्यात घेऊन चला, तिथे फोडतो बिंग सारे ,
गावक-यांनो सावध होऊन,भुताटकीचे प्रकार जाणून घ्या रे !"
गाव लोटला पाहण्या आक्रित,दिसे म्हातारी जिवंत बांधलेली
मृत्यूची बातमी तिच्या शत्रूनी, विनाकारणच होती उठवलेली
घेऊन कब्जा तिच्या घराचा, गैरवापर करतो पोलीस पाटील
दारू अन् अंमली पदार्थ बनवण्यात गावचे पुढारी होती सामिल
एकटी म्हातारी कसा करेल प्रतिकार ह्या नाठाळ गुंडांचा
गावालाही दूर ठेवले , करून प्रचार बंगल्यातील भुताटकीचा
पण म्हातारी हुषार मोठी, बांधून राही तिथेच घटकाघटका
पाहून रोज करिते वर्णन,पाठवी बातमी धाडून विश्वासू सेवका
तिच्याच सल्ल्याने आला होता वैज्ञानिक गावी लावण्यास शोध
परी गावकरी भेकड इथले, काहीच त्यांनी न घेतला बोध
आज येई तो गावी पुन्हा, बनुनी इन्स्पेक्टर देसाई वर्दीमधला
मृत्यूची बातमी ज्याच्या पसरवून घाबरवले होते सा-या गावाला
गावामध्ये राहून त्याने केले लपून शोधकार्य महान
विदेशी दारू अन् गांजाच्या कोठारांची केली धूळधाण
अंमली पदार्थांची तस्करी, करोडोंचे मिळवी जो परकीय चलन
परकीय तस्करटोळीचा तो नेता करीत होता पाटलाशी गठबंधन
भुताटकीच्या नावाखाली चालत होती जी गुन्हेगारी गावात
बंगल्यातील रहस्य उलगडले आज आनंद दाटे गावक-यांत