टिपटिपता थेंब
टिपटिपता थेंब
डोक्यावरून न्हालीस की गच्च बांधून ठेव केस
शुभ्र टॉवेलमध्ये
घट्ट लपेटून घे सारा मोकळेपणा
आणि लपव आजुबाजूच्या जगापासून
तुझा रिता शहाणपणा
प्रतिबिंब न पहाता उकळत्या चहात
शांत कर वादळे दूध घातल्यासारखी
ओल्या केसातील ओल्या मनातील
आणि लाटत राहा पोळ्या पटापट
चिरून कातून घे भाजीसारखच स्वत:ला
भरून टाक टिफिन मुलांचा
कपाळावरून टिपटिपता थेंब पुसून घे
टॉवेलच्या बांधाला न जुमानता
येउ पाहतोय जगाला भेटायला
काही वेळात सुकून जातील केस
आणि आटून जाईल थेंबही
तोवर गुंतवून ठेव मनाला
फेक कच्च ओला टॉवेल दोरीवर
त्यालाही सुकुदे कोरडाठक्क
उदयाला गच्च बांधून ठेवायचे आहे
पुन्हा त्याच शुभ्र टॉवेलमध्ये