विवाहितेचा छळ
विवाहितेचा छळ
मेंदी लावूनी हातास
आली नटून सजून
नववधू लक्ष्मी आली
कशी बघते लाजून
येता नवीन घरात
चार दिस कौतुकाचे
भासतसे तिला जसे
भोवताली सुख नाचे
नव्या नवतीचे दिस
कसे लगेच संपती
हळूहळू छळवाद
सुरू नवरी भोवती
कधी टोचून बोलणे
कधी अबोला धरणे
उणी दुणी माहेरची
तिच्या समोर काढणे
सासू विसरली कशी
कधी तीही सून होती
लेकीपरी सांभाळावे
इच्छा मनातून होती
स
ांभाळून मोठी केली
लेक सासरला गेली
दारी माप ओलांडून
लक्ष्मी घरामध्ये आली
तिच्या नाजूक जीवाला
असा त्रास देऊ नको
तिच्या मनात द्वेषाला
उभा राहू देऊ नको
मान तिला लेकीसम
जरी असेल ती सून
जीव लाव असा तिला
माय माऊली बनून
आयुष्याची संध्याकाळ
वाटे सुखामध्ये जावी
सूनेसाठी सासूबाई
सदोदित आई व्हावी
तिला वाटावे नेहमी
हेच सासर माहेर
तीच लेक असे तुझी
सांभाळील जन्मभर