STORYMIRROR

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Action

4  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Action

सूर्यग्रहण

सूर्यग्रहण

2 mins
9.4K



गरजला सूर्य, या सूर्यमालेत आहे कोण श्रेष्ठ माझ्याविण?

ऐकून वारंवार ही दर्पोक्ती त्याची, चंद्राला आला शिण


केला निश्चय चंद्राने एक दिवस या सूर्याला मी शिकविन धडा

लागेल या पृथ्वीवासियांना माझ्या सुप्त शक्तीचा छडा


अमावस्येच्या 'शुभ मुहुर्तावर' चंद्राने पांघरला काळा बुरखा

आज्ञा केली ता-यांना बाजूला तुम्ही सरका


एक - एक पाऊल टाकीत चंद्र पोहोचला सूर्याच्या निकट

कल्पनाच नव्हती सूर्याला काय ओढवणार आहे प्रसंग बिकट


केली चंद्राने हळूहळू सुरुवात गिळावयाला सूर्यबिंब

भेदरलेला सूर्य झाला घामाने ओलाचिंब


कळालेच नाही त्याला हे काय आक्रीत घडले

काळ्याकुट्ट भुताचे हे धूड़ कुठून अंगावर पडले


काही क्षणातच चंद्राने केले निष्प्रभ सूर्याला

पसरला अंधार, चोहीकडे हाहाःकार उडाला


पडताच अंधार आकाशात दिवसा प्रकटले तारे

पाहूनी हे अजब मिरॅॅकल अवाक झाले सारे


झाकताच सूर्य त्याभोवतीचे प्रभामंडळ प्रकटले

पृथ्वीवासियांनी त्यालाच 'सौरकिरीट' म्हटले


आणि प्रकटले त्याच्याभोवती ते बेलीचे मणी

वाटत होते जणू जडविले

माणिकच कोणी


पाहावयास हा अप्रतिम देखावा, लावले लोकांनी सौर गॉगल

त्या अद्भुत देखाव्याने लोक झाले आनंदाने पागल


फसगत झाली पक्ष्यांची परतले घरट्यांमधी

'इतुुक्या लवकर नव्हता सरला, दिवस कधी याआधी'


घटले तापमान, पडली थंडी, लाजाळूचे मिटले पान

सूर्यफुलांनी देखील गपकन, घातली खाली आपली मान


गुदमरला जीव सूर्याचा, केला देवाचा धावा

कोणीतरी या दुष्टाला, येथून पळवून लावा


चंद्राच्याच मनात शेवटी, दाटून आली करुणा

मनात म्हटले आता तरी असे हा, करणार नाही पुन्हा


हळूच सरकला चंद्र, पहिला किरण पृथ्वीवर आला

हिऱ्याची ती अंगठी पाहून, सर्वांना आनंद झाला


हळूहळू सरकत- सरकत, चंद्र दूरवर गेला

सूर्याचा यामुळे, जीव भांड्यात पडला


वाटले सूर्याला हा होता, आपल्याला संपवण्याचा कट

अखेर वाचलो, टळले शेवटी जिवावरचे संकट


खात्री करून घेतली सूर्याने, आणि पुन्हा गरजला

आहे कोण या सूर्यमालेत जो आव्हान देईल मजला?


मारुनी डोळा सूर्य म्हणाला, पहा कसा पळाला

माझ्या सामर्थ्यापुढे, चंद्राचा पोपट झाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action