वर्गामधल्या मुली
वर्गामधल्या मुली


वर्गामधल्या मुली जेव्हा
बेभान होऊन नाचतात
माझे हात आनंदाने
टपटप गारा वेचतात.
मुली खेळतात झिम्मा, फुगडी
मुली खेळतात लपंडाव
मुली होतात वर्गासोबत
हेलकावणारी संथ नाव.
छोट्याश्या नाटुकल्यातून
मुली जगतात मनासारखे
जन्मभर जपतात मुली
मनतळाशी लखलख आरसे.
मुली घेतात गरगर गिरक्या
मुली पितात उधाण वारा
मुली अशा व्यापून टाकतात
शाळेमधला भवताल सारा.
मुली येतात सहलीला
मुठीमधे स्वप्ने घेऊन
वाऱ्यावरती भिरभिरणारे
मनाचे भिरभिरे घेऊन
वर्गामधल्या मुली जेव्हा
मोकळेपणी श्वास घेतात
माझे डोळे मायेने
पुन्हा पुन्हा दृष्ट काढतात!