STORYMIRROR

Murari Deshpande

Action

4  

Murari Deshpande

Action

धृतराष्ट्र फार झाले

धृतराष्ट्र फार झाले

1 min
40.6K


कानावरी प्रसंग 

जे आज चार आले 

मज वाटतेच येथे 

धृतराष्ट्र फार झाले

रस्त्यात सून जळते , 

मैत्रीण[ ? ] जाळी कोणी 

सारे बघेच अंध 

डोळे असून दोन्ही

दिवसा पडे दरोडा 

खच्चून दाट वसती 

गेले किती कुणाचे 

नंतर निवांत पुसती

कुणी सोनसाखळीला 

घेऊन धूम पळतो 

किंचाळते भगिनी 

तेव्हा प्रकार कळतो

काही जमुनी गुंड 

एकास देती मार 

बोथट समाज शस्त्रे 

लावील कोण धार ?

घालून मान खाली 

जो तो कशास जगतो 

निष्क्रीय सज्जनांना 

दुर्जन हसुनी बघतो

वस्त्रेच द्रौपदीची 

जातात रोज हरुनी 

दुः शासनास झाली 

वर्षे किती मरुनी

डोळ्यासमोर घडते 

तरीही करोनी पाठ 

अंधुक समाज दृष्टी 

नाही कणाही ताठ

ते मोजकेच गुंड 

तरीही समाज कापे 

मस्तीतले मवाली 

करतात रोज पापे

वेचून ठेचण्याचे 

ठरवील समाज जेव्हा 

खचतील हे नराधम 

पळतील लांब तेव्हा

चुपचाप सर्व बघणे 

हाही गुन्हाच आहे 

अन षंढ कायदाही 

बोथट पुन्हाच आहे !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action