Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mrudula Raje

Classics

3  

Mrudula Raje

Classics

सुखद स्मृती

सुखद स्मृती

1 min
146


पहाट वेळी कुट्ट अंधारी , अंगावरती येई शिरशिरी 

झोप अनावर जरी होतसे, उठवण्याची आई त्वरा करी 

आजी मग उठवे प्रेमाने आम्हां, दारी लावून दिव्यांच्या ओळी

चढाओढ लागे भावंडांमध्ये , करावयास दिवाळीच्या आंघोळी 


पाटावरती बसवून आजी, लावी सुगंधी उटणे गवलाकाचरी 

केसांवर नारळ दूध चोपडे, शिकेकाई नहाणाची गंमत न्यारी 

काळोखात अभ्यंग स्नान चाले ,भाऊ फटाके फोडी तोवरी

नहाण आटपून देवासमोरी, आशीर्वच देऊन आई औक्षण करी 


अंगण शेणाने सारवले सुंदर, दारी शोभे सप्तरंगी कणा रांगोळी

आकाशाशी करण्या स्पर्धा , आकाश कंदील चढे ऊंच आभाळी 

लाडू , करंज्या, चिवडा , चकली , अनारशांवर सुंदर जाळी 

आजी, आई , फराळ बनवती , शंकरपाळी अन् कडबोळी 


लक्ष्मी पूजन झाल्यानंतर , लाह्या बत्तासे प्रसादाने भरे ओंजळ  

लाडू करंजी त्यापुढे फिकी , प्रसाद गोड वाटे त्यासमयी मंगल 

मन धावतसे अंगणाकडे, लवंगी फटाके फोडण्याची धांदल 

भुईचक्र अन् अनार शोभती, सुतळी बाॅम्ब अन् राॅकेटची दंगल 


पाडव्यास घरी जमती सारे , हास्याचा महापूर अवतरे 

आत्या, काका,भावंडांचा, दूरवर ऐकू येई गलका 

नानाविध बनती पक्वान्ने , पदार्थांचा सुगंध दरवळे 

आग्रहाने रंगती पंगती, विड्याचा मग आग्रह हलका  


भाऊबीजेला नजर सुनांची भावांची करीतसे प्रतिक्षा 

आगमनाने मामांच्या द्विगुणीत, आनंद आईच्या चेह-यावरचा 

भाऊबीजेचा भव्य सोहळा रंगतसे मग माजघरामध्ये 

औक्षण करती बहिणी प्रेमाने,भाऊ देती आहेर माहेरघरचा 


दुस-या दिवशी संपवून दिवाळी, जाण्या निघती सर्व मंडळी 

फराळाचे डबे भरताना , नकळत डोळे येती भरुनी

नमस्कार थोरामोठ्यांना, आलिंगन भावा-बहिणींना 

निरोप देत एकमेकांना, सारे नातलग जाती निघुनी 


आता कुठली अशी दिवाळी, कुठे पहाटेच्या आंघोळी 

फ्लॅटच्या खुराड्यांमध्ये कुठे, कशी काढावी रांगोळी 

समजावते मीच मनास माझ्या, बदलली जरी आज दिवाळी 

खंत मनामध्ये कशास,जेव्हा सुखद स्मृतींनी भरल्या ओंजळी 


            


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics