ऋतुचक्र
ऋतुचक्र
समृद्ध संस्कृती भिन्नभिन्न प्रांती प्रकटते,
सृष्टीतील रम्य ऋतुचक्र मासमाला लेऊन येते
वेद वदताती ऋग्वेद म्हणे जन्मदाता ऋतू शब्दाचा,
हंगाम अर्थी उल्लेखला महिमा वसंत, ग्रीष्म, शरदाचा
सण, सोहळ्यांची बहर येते हरेक ऋतूत,
व्रत वैकल्ल्यांचे पावित्र्य साधते हिंदू पंचांगात
ऋतुश्रेष्ठ नामनिधान सार्थ वसंत ऋतुराजाला,
चाहूल लागताच त्याची वसुंधरा पांघरते रंगबहार शेला
शिशिरात होळी सप्तरंगी रंग उधळते,
धुंदित मन मोहून जाते अन अंग थंड वाऱ्याने शहारते
जादूगार तो वसंत समस्त सृष्टीला उत्साहाची लहर आणतो,
मोहोर फुलून आंब्याचा झाडावर हळूच कुजबुजतो
शिशिर सरताच वसंताच्या आगमनाची सुवार्ता देतात,
जाई, जुई सारी मंडळी ऋतुराजाला सुगंधी उटी लावतात
ग्रीष्माचा हैराण वणवा अंग लाहीलाही करी,
श्रावणातील वर्षाराणी श्वेत जलधारांचा वर्षाव धरी
शरदात रात्र जागवते कोजागिरीची, नऊ नवे नवांकुर नवरात्रीचे,
दिव्यांची आरास सजते वेध दीपावलीचे
सहा ऋतूंचे सण सोहळे परी भुलवी मजला वसंत,
अनंगदेवाचा प्रेषित भासे मज; अंगप्रत्यंग निसर्गाचे खुलते या ऋतूत
वसंत शोभे राजा ऋतूंचा, हसरी लाजरी वर्षाराणी आनंदाचा वर्षाव करते,
हेमंतात संक्रातीने तोंड गोड होते; शिशिरात माघी गणपतीने उधाण येते
ऋतू सारे लेणे वैभवाचे; चराचरात चैतन्य चोहीकडे बहाल करी
नादमधुर, गंध सुगंधाने, रंगरूपाने धरेवर स्वर्ग निर्माण करी