राम जन्मला सखये
राम जन्मला सखये
चैत्रमासी शुद्ध पक्षी
तिथी असे नवमीची
उष्ण वाते थबकली
पाने जागीच तरुंची (१)
यज्ञ सार्थकी लागले
मना सफलता पूरी
जन्म जाहला रामाचा
आज अयोध्या नगरी (२)
बहुभाग्ये आज जनी
हर्ष उसळला मनी
दुंदुभीच्या सुखनादे
वार्ता जनमनी झणी (३)
नगरीत अयोध्येच्या
मोद भरुनी राहिला
ताल सूर नर्तनात
वाद्यवृंद गं रंगला (४)
प्रभा दिव्य मुखावरी
कशी गोड पसरली
माय तृप्त दर्शनानी
मनोमनी हरखली (५)
भाग्य उजळे वंशाचे
लाभे पुत्र सुलक्षणी
राम जन्मला सखये
आली सुखाची पर्वणी