प्रीतीचा ताजमहाल
प्रीतीचा ताजमहाल
"शहाजहानने बांधला
मुमताज बेगमसाठी
प्रीतीचा अमर ताज!
मीही तुझ्या प्रेमासाठी
चढवीन अस्साच सुंदर साज!"...
तो म्हणाला "का, नकोशी
झाले मी तुला?
एवढ्यातच सामोरे जायला
सांगतोस मला मृत्युला?""
ह्या!! किती गं तू अरसिक!"
तो म्हणाला,"
लोकांना ताज म्हटला
की काव्य सुचते!
तुला मात्र त्यामध्ये
मृत्यूचे भय दिसते?
अगं, जीवन आहे नश्वर
पण प्रेम आहे अमर!
मृत्यू समीप ठाकला तरी,
प्रेमाचा न सरतो बहर!""
हो? मग चल तर,
आपण प्रेमानंद घेऊ
हातात हात गुंफून दोघे,
मृत्युला आलिंगन देऊ!
नदीच्या खळाळत्या प्रवाहात
दोघे जलसमाधी घेऊ
गिरी शिखरावरून
दिसणा-या अनंतात विलीन होऊ!
बोल, करतोस माझ्या
ह्या मागणीचा स्वीकार?
का त्यासाठीही घ्यावा लागेल तुला,
प्रथम आई-वडिलांचा होकार?
अरे वाचाळ प्रेमवीरा,
तू प्रेमाची महती गातो!
पण वडिलांसमोर
"हुंडा घेणार नाही "
हे सांगताना मात्र
तुझा घसा सुकतो?
का बांधणार आहेस ताजमहाल ,
माझ्याच वडिलांच्या हुंड्याच्या पैशातून?
आणि जाळणार आहेस त्यावर चिराग,
माझ्याच बलिदानाच्या आगीतून?
दाखला देताना सुचली तुला
शहाजहानची प्रीतीगाथा!
पण का नाही दिसली
त्या सलीम-अनारकलीची व्यथा?
प्रेम करताना त्याने
नाही पाहिला दर्जा
वा जातकुळी!
प्रेम विफल झाले म्हणून
चढू लागला तो मृत्यूसुळी!
नाही बांधला बीबीचा मकबरा,
नाही बांधला ताजमहाल!
परी अनारकलीसाठी,
करू पाही तो त्याग विशाल!
बोल माझ्या प्रियकरा,
होशील तू माझा सलीम?
प्रीती आपली फसलीच तर,
घेशील तू वीष जालीम??
नको मला ताजमहाल,
नको अकबराचा ऐनेमहाल!
निराशेच्या अंधा-या रात्री,
हाती घे प्रेमाची मशाल!
मीही तुझ्या संगे संगे
मृत्यूला भेटीन खुशाल!
मृत्यूला भेटीन खुशाल!!

