पितृपक्ष
पितृपक्ष
दोन कावळे झाडावर
बोलत होते मजेने
पुसत होते एकमेका
काय खाल्ले चवीने
एक म्हणाला कंटाळलो
खाऊन रोज तेच तेच
कडू कारले, भात ,कढी
गवार, भोपळा, खिरपुरी
आपल्या रंगाला शोभणारी
आंबट गोड चटणी काय
खुसखुशीत खमंग ऐसा
भाजणीचा वडा नि काय
माणसंसुद्धा लबाड अशी
खीर ओरपतात गोडशी
पण कडू भाजी कारल्याची
लावत नाहीत तोंडाशी
खरंच बाबा ती कडू भाजी
मलासुद्धा नाही आवडत
चोच सुद्धा अशा पदार्था
चुकूनही मी नाही लावत
अरे पण तू अशाने
करतो आहेस ना विश्वास घात?
आत्मे राहतील उपाशी
त्यांना का तू देतोस ताप?
अरे बाबा आपण खाऊन
आत्मे होतात तृप्त
हा माणसांना होतो
फक्त एक आभास
पण प्रत्यक्षात ते होतात तृप्त
घेऊन सुग्रान्नाचा वास
आता मला एक सांग
या दिवसात हेच पदार्थ
याचा कोणी लावला शोध?
का मेलेल्यांच्या आत्म्यांनी
स्वप्नात येऊन केला बोध?
पूर्वीच एक ठीक होतं
फास्टफूडचा नव्हता जमाना
त्यांनी कधी चाखलंच नव्हतं
रगडा- पॅटीस ,चाट -मसाला
पण आमच्या सुद्धा बदलल्या चवी
बदलला आहे खाना -खजाना
मग पितृपक्षात सुद्धा आता
थोडा बदल करून पहा ना
खीर -पुरी ऐवजी पाव -भाजी का नाही?
का वाढत नाही कुणी
चायनीज आणि फ्राईड राईस ?
अरे एकदाच वाढून बघा
आजी आजोबा होतील खुश
तोंडाला त्यांच्या सुटेल पाणी
आशीर्वाद देतील खूप खूप
