ओढ
ओढ
ओढ तिची अनिवार
तान्हुल्याला बघण्याची
धरी उराशी प्रेमाने
घडी परमानंदाची
ओढ मित्रमैत्रिणींची
चिंचा बोरे लुटण्याची
गोड गुपिते मनीची
हळू कानी सांगायची
ओढ मुग्ध यौवनात
लागे जीवा हुरहूर
सख्या भेट झडकरी
मन झाले सैरभैर
ओढ लागे दोघांनाही
बदलीच्या गावी जाता
विरहात रात्र मोठी
मनी आठव दाटता
ओढ मुग्ध नवोढेला
मनी लागे माहेराची
येता न्यावयासी भाऊ
लगबग तयारीची
येता ही कांचनसंध्या
पैलतीर दिसू लागे
ओढ ईश्वरी शक्तीची
जड बंध मुक्त झाले
