नववर्षाचे स्वागत करुया
नववर्षाचे स्वागत करुया
काव्यप्रकार अष्टाक्षरी
पानगळ शिशिराची
आता थांबली गं सये
पालवी ही वसंताची
झाडांवरी फुलली गे (1)
राजा ऋतुंचा वसंत
वसुंधरेला खुलवी
कशी नटली अवनी
साज हिरवा लेऊनी (2)
फुलझाडे बहरली
गंध गेला रानोमाळी
वसंताच्या स्वागताला
धरा कशी ही खुलली (3)
शमविण्या उन्हासही
वसंतीय वारे येती
झाडे वेली तरारल्या
सुगंधही बरसती (4)
आला आला हा वसंत
उत्साहाने दिमाखाने
सृष्टी सौंदर्य सोहळा
रंगे वसंतरंगाने (5)
आला वर्षारंभ सण
गुढीपाडव्याचा सखे
गुढी उभारुनी दारी
बांधू तोरण सौख्याचे (6)
नववर्षाचे स्वागत
करु आनंद सौख्यानी
लाभो आरोग्य संपदा
ईश्वरासी विनवणी (7)
