मनमोहना
मनमोहना
अरे कान्हा, मनमोहना, सोडून गेला मज कसा
बाई माझा गं तुजवाचून जीव झाला वेडा पिसा।।धृ।।
धून ऐकता तव मुरलीची
शुद्ध राहिली नाही तनूची
कळला नाही खांद्यावरचा ढळला पदर केव्हा कसा।।१।।
डोईवरती दही दूध लोणी
पेंद्या सुदामा सवे घेऊनी
खडा मारून माठ फोडतो हसतोस लबाडा कसा।।२।।
कंसाचे तू प्राण घेतले
चाणूराचेही मर्दन केले
कालियाला जळी ठेचले मारिली पूतना अवदसा।।३।।
नरकासुराचे प्राण हरसी
सहस्त्र नारी मुक्त करसी
सुदर्शनाने सूर्य अडवून मारले जयद्रथा दिवसा।।४।।
चित्तचोर तू अवखळ भारी
गोड वाटते खोडी तुझी तरी
सोडून जाता जीव तळमळे पाण्या विना मासा।।५।।
