मनी खाई बासुंदी
मनी खाई बासुंदी
भुकेलेली मनीमाऊ
कावरीबावरी झाली
येरझाऱ्या घालूनिया
दूध शोधायला गेली (१)
गँसवर रटारटा
आटायला ठेवलेले
पेढे लावून मामींनी
दूध होते झाकलेले (२)
गोड गोड बासुंदीचा
घमघमाटाचा वास
हळू जाळी हलवून
मटामटा खाई खास (३)
आजी म्हणे बघ बरं
बासुंदीला निवलेली
मनी तोंड बुडवून
आरामात रमलेली (४)
काठी घातली पाठीत
सटकन् रपकन्
पळे मनी झटकन्
निसटली चटकन् (५)
मस्त सुस्तावली मनी
जिन्याखाली अंधारात
नाचे बासुंदी पोटात
मार बसला जोरात (६)
