मनाचा कप्पा
मनाचा कप्पा
जरा मनाचा कप्पा आवरावा म्हटलं .........
उघडला तर अगदी अस्ताव्यस्त........
बालपणीच्या चिंचा बोरांच्या , धपाट्यांच्या खेळातील लुटुपुटू भांडणांच्या मैत्रीच्या गप्पांच्या प्रेमाच्या हितगुजांच्या ,अॉफिसमधे लागल्यापासून ते रिटायर होण्यापर्यंतच्या सर्व आठवणी आगदी अस्ताव्यस्त पडलेल्या......
काही कटू ,कठोर ,दुखावलेल्याही....जरा आत डोकावलं तर व्हायोलिनची आर्त गाणी...
सिंथेसायझरची उडत्या चालीची गाणीही....
अगदी हातात हात घालून दिमाखाने उभी.......
त्यात सरांनी काटेकोरपणे काढलेल्या चुका......
तसेच जमल्यावर हांssssम्हणून दिलेला हुंकार
मैत्रिणींबरोबरचे चेष्टा...विनोद
कोणाची प्रकरणे .....चावट कॉमेंटस......
सारंच विखुरलं होतं
सासरी आल्यावर खेडेगावच्या नातेवाईकांचे स्पष्टोक्तीचे टोमणे.....न झालेल्या चुकांबद्दल मागावी ल
ागलेली माफी ...रडताना नव-याने काढलेली समजूत ....
सगळंच कसं कोठीतल्ल्या वस्तूंसारखं ठप्प साठून राहिलं होतं.......
कप्पा आवरायलाच हवा होता......
प्रथम कटू आठवणी बाहेर काढल्या...
अपमान ,टोमणे ,विनाकारण मागितलेली माफी ....अगदी
लांब दूर फेकून दिल्या
किती हलकं वाटलं....
रागाच्या ...चिडचिडीच्या...आजारपणाच्या...वेदनांच्या ...दुःखाच्या...सर्व आठवणी फेकून दिल्या ....
आता तर पिसासारखं हलकं वाटत होतं .....
मग पुन्हा कप्प्याकडे नजर टाकली....
अरे!....अडगळीच्या वस्तू केव्हाच हद्दपार झाल्या होत्या ......
खाली उरलं होतं आठवणींचं
आगदी छान मुरलेलं लोणचं......वाद्यांचे स्वर मला साद घालत होते ......त्यात रंगून जायला होत होतं......ह्या गोड आठवणी....भुरळ घालणारे स्वर...मला पैलतीरापर्यंत सुख....समाधान.....शांती देणारे .....