मिठी तुझी माझी
मिठी तुझी माझी
शाळेतून मी येताच
मिठी तुझी कडकडून
शिणलेली तनू माझी
जात असे सुखावून
कित्ती कित्ती गुजगोष्टी
तुझ्या प्रेमळ मिठीत
अरे किती वेळ झाला!!
सांगायची मी गोडीत
गेले ते रम्य दिवस
काळ पुढे सरकला
त्यासवेच आपल्यात
दुरावाही टपकला
आता तुझा दिन सुरु
दहा वाजताच रात्री
कसातरी थांबतोस
फक्त थोड्या वेळासाठी
बोलावेसे वाटूनही
शब्द अडती ओठांना
काळजात ह्या कुठारी
बांध घालिती बोलांना
जुजबीच बोलून तू
कसा मागे फिरतोस?
मिठी तुझी माझी राजा
कशी रे विसरतोस?
आत्ता बोललास तर
अर्थ असेल शब्दांना
अर्थ नसेल मिठीला
नंतरच्या त्या बोलांना
