मेहंदीच्या पानावर - आठवणीतली मेहंदी
मेहंदीच्या पानावर - आठवणीतली मेहंदी
एक ती आठवणीतली कडू मेहंदी
पण सुंदर नाजूक पांढरी आमसुली फुलं असलेली
बागेला कुंपण म्हणून लावली जाणारी
हिरवी गार पाने असलेली मेहंदी
बागेतील झाडा फुलांना संरक्षण देणारी
गाई बकरी कुणी तिच्या वाटेला जात नसे
तारेच्या कुंपणा लगोलग लावली जाणारी कडू मेहंदी
लहानपणीची एक सुंदर आठवण आणि
आठवणीतच राहून गेलेली कडू मेहेंदी
शाळेतून परतताना आडोश्याला उभे राहून मैत्रिणीचा निरोप घेताना
दुपारच्या उन्हात थोडी सावली देणारी मेहंदी
प्रत्येक घराच्या , मंदिराच्या कुंपणाला रांगेतून लावलेली मेहेंदी
हाताला लावून रंग देणाऱ्या मेहंदीच्या इतकी उपयोगी आणि नशिवान नाही ती
पण खूप उपयोगी असलेली अशी कडू मेहेंदी
दुसरी थोडी बारीक गर्द हिरवी पानं असलेली मेहंदी
कडू मेहंदीच्या प्रमाणात खूप कमी ठिकाणी आढळणारी
शाळेतून येताना नजरेस पडताच भान विसरून ती पानं
तोडून रुमालात युनिफॉर्मच्या फ्रॉकच्या खिशात भरून आणून
दुपारी शेजार पाजारचे मित्रमैत्रिणी मिळून
जागा मिळेल तिथे कुणी बंद घराच्या दारासमोर तर कधी गच्चीत दगडाने पानं वाटत असू त्यात थोडा काथ टाकून
तळहातावर नखांना लावून वाट पहात बसायचो
कुणाची लाल - चूटुक तर कुणाची रंगे केशरी
शाळेत मिरवत असू मैत्रिणींना मेंदीचा रंग दाखवून
सणावारी हरितालिका पूजा यासाठी न चुकता
आजी आई काकू बहिणी ह्यांनाही मेहेंदी लावून
हौस पुरवत होतो तेही निःशुल्क आणि स्वकष्टाने
अजूनही त्या मेहंदीच्या उग्र पण मोहक वास मनात साठलेला आहे
सुरेश भट लिखित स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सुरातील ,
प्रत्येक मराठी व अमराठी माणसांचे प्रिय गाणे....
"मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग...". खरंच मन अजून झुलते आहे ग...
