निसर्गातील सातत्य
निसर्गातील सातत्य
सातत्य नियमितता हे निसर्गातील वैशिष्ठ्य
शिस्त आणि नियम यांची परंपरा
बरच काही शिकवतो निसर्ग आपल्याला
सूर्योदय हा होणारच तसाच सूर्यास्त ही
आणि त्याबरोबर होणारा चंद्रोदय
आणि आकाशात चमकणारे तारे
तो ही कले कले ने वाढत जाणारा
तसेच कले कले ने कमी होत जाणारा चंद्र
दिवस आणि रात्र ह्याचा नियम कधीही चुकत नाही
ऊन्हाळ्या नंतर येणारा पावसाळा
आणि त्यानंतर पडणारी थंडी
हे ऋतुचक्र नेहमी चालूच असते
रातराणी ही रात्रीच बहरते
पारिजातकाच्या सडा पहाटेच पडतो
मोगरा , गुलमोहर हा उन्हाळ्यातच बहरतो
गुलाब सुद्धा अगदी वाट पाहायला लावतो
कळीचे सुंदर फुलात रूपांतर होई पर्यंत
रसाळ ताजा आंबा हाही उन्हाळ्यात पिकतो
जांभूळ , पेरू , संत्री , मोसंबी , डाळिंब
बोरं , खरबूज, कलिंगड, द्राक्ष आणि पपई
असे अनेक निरनिराळे विशिष्ट
ज्या त्या ऋतूमध्ये आढळणारी फुले - फळे
रातकिड्यांचा एका सुरात येणारा आवाज
पहाटे सूर्योदय होताच घरटे सोडून जाणारे पक्षी
त्यांचे थवे आणि सुरळीत आकाशात विहरणारे
सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा घरट्याकडे परतणारे पक्षी
एका रांगेत चालणारी छोटी बदकांची पिले
पावसाची चाहूल लागताच सुरात गाणारी कोकिळा
ही एक शिस्तच तर असते ना !
घरटे बांधण्याची कलाकुसर तसेच
कुटुंबासाठी धडपडणारे लहान - मोठे पक्षी - प्राणी
सातत्याने झुळझुळ वाहणारे झरे आणि
त्यातून निर्माण होणारा संगीताचा सुर
न थांबता वाहणारे लहान - मोठे धबधबे नदया
तर थंड प्रदेशात दिसणारा पांढरा शुभ्र बर्फ
आणि त्यातून निर्माण होणारे आल्हाददायी सौंदर्य
निरनिराळ्या रंगांचा परिचय देणारा निसर्ग
कधी अचानक तुटून पडणार तारा
तर पावसाळ्यात लख्ख चमकणारी वीज
पावसानंतर पडणारा सूर्यप्रकाश आणि
त्यातून निर्माण होणारे विलक्षण इंद्रधनुष्य
न विसरता न डगमगता न थांबता
सातत्याने चालू राहणार निसर्गाचा क्रम
निर्माण होणारे विलक्षण मनोहारी दृश्य
सौंदर्याने वेड लावणारा असा हा निसर्ग
शिस्त आणि नियम बद्ध असलेला
कधीही न चूकणारा न थकणारा
उपयोगी आणि खूप काही शिकवणारा असा हा निसर्ग!
