माणसासारखं वागावं..
माणसासारखं वागावं..
प्रगती करुन कोणी जाताना पुढे
तुझं का रे जळतय?
वाकड्याच्या नादाला लागेना कोणी
गरीबांलाच लोक छळतय.
माणसासारखच वागावं माणसानं
एवढं मला कळतंय...
लबाड लांडगा खातोय तुपाशी
कष्ट करणारा रोजच उपाशी
खऱ्याची माय जाई वनवासी
जगाची या रितच अशी
कुत्र पिठ खातय इथे
अन् आंधळं दळतय...
गरीबांचा रोज जातोय बळी
न्याय देवता आहे आंधळी
दूर्जनांचीच ही दुनिया सगळी
दुष्टांची या व्हावी होळी
घडताना पाहून वाईट सारंच
जीव लईच हा तळमळतय...
गरीबांच्या होई जीवाची दैना
कष्टाला मुळीच बरकत येईना
दुष्टांचा कसा या नायनाट होईना
संकटकाळी कोणी धावून येईना
कुठच नाही गरीबांचा न्याय
साऱ्या जगालाच हे कळतंय...
उचापती, कुरापती करायच्या किती?
बेइमानी झाली जगी या किती
खरी कुठे राहिली कोणती नाती
इथं कुठं कोणाशी खरं सुत जुळतय..
