लेक माझी लाडकी (अष्टाक्षरी)
लेक माझी लाडकी (अष्टाक्षरी)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
लेक माझी लाडाची ती
कौतुकात वाढविली
जनरीत पाळावया
घरी परक्याच्या दिली.।।धृ।।
करायाची खोड्या किती
बालपणी होती द्वाड
येता समज बाईची
लपे पदराच्या आड
स्त्रीसुलभ भावनांनी
लाज आली तिच्या गाली।।1।।
सुखे संसार थाटाचा
झाला सुरु पतिसवे
गीत आनंदाचे रोज
ओठांवरी नित्य नवे
वृद्ध सासू सासऱ्यांची
सेवा लाडुलीने केली।।2।।
माझे कौतुक, काळजी
आज तिलाही पटली
मातृत्वाच्या दागिन्याने
जेव्हा लाडूही नटली
'आई'असे म्हणूनिया
हळू कुशीत शिरली।।3।।
वृद्ध आम्ही मातापिता
कुणी द्यावयाचे लक्ष
पुत्र बनुनि लाडकी
कर्तव्यास झाली दक्ष
अभिमान वाटे तिचा
कन्या ऐशी रत्नावली।।4।।