गारवा व्हरक्याचा
गारवा व्हरक्याचा


मास सरला पुसाचा
थंडी जरा न राहिली
सूर्यदेव तापतोया
होते जीवाची काहीली
करा लगबग आता
नका घालू येळ वाया
जुंपा बैलगाडी धनी
माळरानी बरं जाया
पोरंसोरं चारदोन
राहू दया हो संगतीला
शेजारचा गडी एक
येऊ दया की मदतीला
तोडा व्हरक्या रग्गड
पोरं गोळा करतील
उचलून डोईवरी
गाडीमंदी भरतील
घालू मांडव दारात
टाकू व्हरक्या त्यावर
लाकडाचे करू खांब
त्याला फांद्याचे छप्पर
गारगार सावलीत
करू दुपारचं खाणं
मूलं खेळतील खेळ
तिथं खूप आनंदानं
व्हरक्याच्या सावलीला
नाही कशाचीच सर
सोसवेना रणरण
तुम्हा सांगते मी खरं
(व्हरक्या=पळसाच्या फांदया)