खरंच बाईपण भारी रे देवा
खरंच बाईपण भारी रे देवा


आई मुलगी बहीण पत्नी
रुपे तिची असती अनेक
नाना भूमिका साकारणारी
अशी स्त्री मात्र केवल एक
कोमलांगी निसर्गत:च ती
तरीही जपते नात्यांचा ठेवा
खरंच बाईपण भारी रे देवा।।
व्यक्त करण्या साऱ्या भावना
सर्वांसाठी ती हक्काची जागा
बिनसता,बिघडता जरा कुठेही
तिच्याचजवळी करितो त्रागा
खापर फोडतो तिच्या माथी
मुळी ना करतो तिची पर्वा
खरंच बाईपण भारी रे देवा।।
चार भिंतीच्या आत बाहेर
कर्तव्यात ना कसूर करते
कुटुंबासाठी जगताना
स्वतः ला आपसुक विसरते
उणीदूणी हसतच साहूनिया
चाखते संसाराचा गोड मेवा
खरंच बाईपण भारी रे देवा।।
नारी ना
जुक ,हळवे मन
परी यंत्रासम सदैव ततपर
समयाचे अचूक नियोजन
अष्टभुजा ती राबते निरंतर
निरपेक्ष भाव नि आपुलकी
अविरत करिते आप्तसेवा
खरंच बाईपण भारी रे देवा।।
वंशास हवा दिवा म्हणुनी
तिचीच होते गर्भजलपरीक्षा
पूजनीय असूनही सितेला
द्यावी लागली अग्निपरीक्षा
असा कसा हा न्याय आगळा
वाह रे माणसा वाह रे व्वा
खरंच बाईपण भारी रे देवा।।
मुलगी नको म्हणुनी होते
स्त्रीभ्रूण हत्या ठायी ठायी
दोषी नसता किती सुनांनी
जीव गमविला हुंड्यापायी
बाईचाच दूजा बाईला
का वाटावा मत्सर हेवा
खरंच बाईपण भारी रे देवा।।
एक रचना माझी