बंध पावसाचे
बंध पावसाचे
गर्जू लागे ढग वीज थयथयाट करी
वृक्ष, वेली डोलू लागे वाऱ्याच्या त्या तालावरी
आल्या आल्या पाऊसधारा चला जाऊ शेतमळा
अन्नदाता शेतकरी आनंदाने लागे कामाला
उभे आडवे डोंगर ते आतुरतेने वाट पाही
जणू त्यांचा सखा त्यांना न्हाऊ माखु घालण्या येई
पावसाच्या आनंदाने मोर नाचतो ग वनी
कुहु कुहु गाते कोकिळा गोड गोड ग ती गाणी
गंध शिंपण करते जणू माती होते जेव्हा ओली
तिच्या सुवासाने ग मन मोहरून जाई
काय सांगू पावसा तुझी किमयाच न्यारी
सर्व सृष्टी नेसली जणू हिरवीगार साडी
फेसाळती ओढे जणू वाटे दूध वाहे सारे
तृप्त होती डोळे पाहून निसर्गाचे रूप न्यारे
संजीवनी रोपांना ती मिळते पाऊसधारेमुळे
हिरवा अंकुर तो वाढे पावसाच्या स्पर्शामुळे
पसरले दवबिंदू वाटे विखुरले मोती
दुरूनच पाहू डोळा हाती नाही घेता येती
बागेमध्ये बहर आला जाई जुई मोगऱ्याला
पारिजातकाचा सडा किती फुले वाहु देवाला
पावसाबरोबर असते सणांचीही रेलचेल
घरोघरी लगबग लहान थोरांची चंगळ
तसा पाऊस ग बाई मैत्री चिंब भिजवणारा
तसा पाऊस ग बाई बालपण आठवणारा
तसा पाऊस ग बाई प्रियकराची ओढ जणू
किती रूपे सांगू त्याची सप्तरंगी इंद्रधनू
असा पाऊस ग बाई निसर्गाला फुलवितो
माणसाशी घट्ट नाते युगे युगे निभावतो
