कोण?
कोण?
भयाण रात्रीची वेळ होती
पाऊस घनदाट कोसळत होता
बाहेर माणसांची चाहूल नव्हती
अंगणात पाऊलभर चिखल होता
अशा वेळेस अचानक आला
फाटक उघडल्याचा आवाज
"कोण असेल ?" धास्तावले मी
काहीच येत नव्हता अंदाज
वीज पुरवठा बंद होता
मेणबत्तीचा प्रकाश मंद होता
केरोसिनचा कंदिल कोप-यात
प्रकाश पाडत अखंड होता
पावलांचा आवाज वाढू लागला
दारावर थाप देऊ लागला
"चोर, लुटेरे, कोण असावे?"
जीव माझा टांगणीवर टांगला
<
p>
नवरा माझा परदेशात
सासू झोपली माजघरात
शेजघरात मी एकटी पडलेय
तळमळत अशी बिछान्यात
काय करावं काहीच सुचेना
भेदरल्या जीवाला चैन पडेना
ओरडून कोणाला हाक मारावी
पण तोंडातून शब्द फुटेना
आणि अचानक दार उघडले
कोणीतरी भसकन् घरात शिरले
खांद्यावर माझ्या हात ठेवून
ओल्या अंगानेच मिठीत धरले
तेवढ्यात लखकन् वीज चमकली
इकडची स्वारी शेजारी दिसली
काय, कसे, हे आक्रित घडले?
डोळ्यांतून माझ्या श्रावणधार बरसली