कोकणची भाकरी
कोकणची भाकरी


दोन वेळची भाकरी
माय राबी मरमर
कष्ट करी जिवापाड
स्वतः खाई चतकोर (१)
चुलीपाशी बसुनिया
माय रांधी प्रेमभरे
सर्वां तृप्त करण्यास
माय वाढे मायभरे (२)
असायची चणचण
नाही कधी कुरकुर
सदा सुहास्य उमले
तिच्या मुखचंद्रावर (३)
शुभ्र पातळ भाकरी
तांदळाची वाढतसे
हास्य ओठांत डोळ्यांत
तिच्या कसे खुलतसे (४)
जाता आता कोकणात
गोडी नाही भाकरीची
आहे आलबेल सारे
दाटी पंचपक्वान्नांची (५)
हात तिचे राबणारे
नित्य मज आठवती
आता नुरली माऊली
दाटतात आठवणी (६)