कन्या
कन्या
परमेश्वर ही तव कर्माचे
येईल फळ देण्या
प्रत्येकाच्या नशिबी असावी
एक तरी कन्या.
कन्येसाठी जीव गुंतला
प्रगतीचा हा मार्ग खुंटला
हीच कामना उरात माझ्या
तिचेच सुख पाहण्या
प्रत्येकाच्या नशिबी असावी
एक तरी कन्या.
मुलगा मुलगी दोन्ही छान
कन्या रत्न देवी समान
तुझ्या सवे रे सुख दुःखाचे
येईल गीत गाण्या
प्रत्येकाच्या नशिबी असावी
एक तरी कन्या.
कधी चंचल कधी हट्टी
तुझी नी माझी जमेल गट्टी
मंजुळ वाणी तुझ्या मुखातील
आतुर मी ऐकण्या
प्रत्येकाच्या नशिबी असावी
एक तरी कन्या.
पती पत्नीची हीच धरोहर
तुझ्या घराची लक्ष्मी खरोखर
वार्धक्यात तुला समजून घेईल
तुझी हि सुकन्या
प्रत्येकाच्या नशिबी असावी
एक तरी कन्या.
मातेची तुझ्यात ममता
दु:ख विसरतो तुझ्यात रमता
विरह तुझा मी कसाच साहू
मज सोडून जाण्या
प्रत्येकाच्या नशिबी असावी
एक तरी कन्या.
