कधी सुटेल गुंता?
कधी सुटेल गुंता?
मन वात्सल्याने भरलेले
दया शांतीने ओथंबलेले
क्षमाशील ती अपरंपार
प्रेम माया करुणासागर
कधी भावभावनांचा गुंता
होई कठीण प्रसंग येता
भांबावे सर्वांना सांभाळता
तराजू तिच्या हाती टांगता
कुणाचे कटू शब्दांचे घाव
कुणी फसवी ना देई भाव
जबाबदारीचा देई भारा
सोडून देई ना देई थारा
अपत्यास जपे जीवापाड
तो ठेवी वृद्धाश्रमी पल्याड
मनात भावनांच्या चिंधड्या
ती जखमा ना करी उघड्या
किती भावनांचा गुंता सोसे
किती मनोमन ते उसासे
हा काळ बदलला तरीही
स्त्री मन गुंता सुटला नाही