झोका
झोका
तान्ह खुदकन हासे
माय कवतुक करे...
डोये भरून पाह्यता
सूप कायजाचं भरे
राती चांदोबा लोयते
जसा नदीच्या थडीत
एक तान्हुलं लेकरू
निजे मायच्या कुशीत...
तान्ह निजल्यावरती
झोका लुगळ्याचा होते
माय गाऊन अंगाई
दोरी मायेनं हालोते
पान्यावरती चांदनं
डोले वाऱ्याच्या झोतानं...
तसा हालते डुलते
झोका मायच्या हातानं...
तिच्या लुगळ्याचा पालू
माय झोक्याले बांधते
कायजीच्या काजयाचा
टीका तान्ह्याले लावते
