कातरवेळी
कातरवेळी
या कातरवेळी आज
भावनांची रेलचेल...
अंतरंगात मनाच्या
जीवघेणी घालमेल...
या कातरवेळी आज
गेला रस्ता अंधारून...
रात्र वेशीवर आहे
वाट पाहत थांबून...
या कातरवेळी आज
मनी उठले तरंग...
एकांताच्या उदासीचे
आभाळाला आले रंग...
या कातरवेळी आज
पापण्यांवर खिन्नता...
डोळ्यांमध्ये पसरली
आभाळभर रिक्तता...
या कातरवेळी आज
घाव मौनाचे हृदयी...
तरी ठेवली आहे मी
माझी तेवत समई...
