इथे भय संपत नाही
इथे भय संपत नाही
दोन हजार वीसची सुरवातच झाली कोरोनाच्या उद्रेकाने,
ढिसाळ नियोजनाची परिणीती जाणवली लॉकडाऊन च्या निर्णयाने.
टाळ्या, थाळ्यांचा गजर करून दिव्यांच्या वातीही पेटवल्या,
प्रवासी वाहतुकीची साधने थांबवून जिल्ह्यांच्या सीमाही बंद केल्या.
हळूहळू संक्रमणाचा विळखा शहरातून खेड्यापर्यंत पोहचला.
---------आणि इथेच भीतीने लोकांच्या मनात घर करायला सुरवात केली II १ II
कोरोनाच्या चाचण्यांची निदान आणि प्रयोगशाळाही धास्तावल्या,
कृतिदले सज्ज झाली आणि रस्त्यारस्त्यांवर संचारबंदी लागू झाली.
हातावर पोट भरणाऱ्याची शहरातून गावाकडे स्थलांतरे होऊ लागली,
शैक्षणिक सत्रे थांबली आणि उद्योगधंध्याची दारेही बंद झाली.
----------आणि येथेच भीतीची व्याप्ती वाढू लागली II २ II
आरोग्यसंवर्धक वस्तूचा साठेबाजार तर आवश्यक वस्तूचा झाला काळाबाजार,
चुकीच्या माहितीचा आणि अफवांचा उधळला मोहोरबाजार.
सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेचे वाजले तीन तेरा आणि झाले सर्व सैरभैर,
रोजच्या रोज नवीन रुग्णांचा वाढता आलेख आणि मृत्यूचे वाढले आकडे भराभर
-------आणि येथे भीतीने जनतेला कवटाळलेच II ३ II
माझे कुटुंब आणि माझी जबाबादारी सुरु झाल्या टास्क फोर्स
आणि हळूहळू चालू झाले अनलॉक एक, दोन, तीन, चार ----
सात महिन्यांच्या कालावधीत ऑनलाइन झाले सर्व सणवार
------- आणि येथे भयाने आपली पकड कुठे थोडीशी सैल केली II ४ II
हळूहळू पूर्वपदावर येणारी स्थिती कुठे स्थिरावते,
तोवर दुसऱ्या लाटेच्या धडकल्या बातम्या.
यूरोप,अमेरिका सारखे पाश्चिमात्य देश पुन्हा एकदा झाले लॉकडाऊन,
आणि उघडलेल्या मंदिरातून देवदेवतांनाही वाटले असेल अपमानित.
-------येथे भितीचे मनोरे पुन्हा एकदा उभारू लागले II ५ II
पुन्हा एकदा मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टनसिंग,
लॉकडाऊन च्या भीतीने पुन्हा वाढली ह्रदयाची धडधड.
अँब्युलन्सच्या कर्कश आवाजानी जाग्या झाल्या भिंती,
वाढता कोरोनाचा प्रभाव-- पुन्हा तोच अनुभव आणि तीच भीती,
-------परंतु आजही इथे भय संपत नाही II ६ II
