गुलाब माझा
गुलाब माझा


सुकून गेला पडला काळा, गुलाब खरा माझा प्रेमाचा,
का ना कळावा अजूनही सखे, भाव गुलाबी प्रेमाचा?
शुभंकरोती ना दिवाबत्ती, नुसतीच कोरडी सांजवात,
कृत्रिम उजेड तुळशीपाशी, दिखावा निर्जीव भक्तीचा.
पुरणपोळी ना साजूक तूप, ना तुपाची धार भातावर,
अन्नपूर्णा आता नाही घरात, ना मिळे घास मायेचा.
खरं सांगू.. नाहीतर राहू द्या, उगीच कशाला वादावादी,
सत्य बाजूलाही का यावा, तो दिवस लाचार होण्याचा?
संततधार ना मुसळधार, उगाच रिपरीप ती पावसाची,
अथांग सागर खोल पाणी, पण ना भिजे पदर साडीचा.
पणजा गेला आज्जा गेला, सांगून गेला बाप पोराचा,
पोरालाही जावंच लागल, कोणी ना इथे कायमचा.
असो द्विअर्थी वा नसो, पण शब्द प्रत्येक इथे कामाचा,
ज्याला समजला तोच जिंकला, दोन बाजू नाण्याच्या.
नाही जमत तरी बळेच रचतोय, शब्द भारी भारीचा,
अन् हरखून पहा म्हणतोय, शेर मतला गजलेचा.