ग्रामीण जीवन
ग्रामीण जीवन
हल्ली ग्रामीण जीवनाचा अनुभव
आला तर यावा लागतो ,
अगदी अस्सल गावठी गावकरी
आपल्याला शोधून दाखवावा लागतो .
परप्रांतातल्या संधीमुळं गावकरी
कुटुंबासह शहरात आला
कालांतरानं आगीनगाडीत,
मोटारीत , विमानात सफर करु लागला
त्यातच उरलेल्यांना रोजगाराच्या
नव्या वाटा दिसल्या
एटीएममधल्या करकरीत बंद्या
नव्या नोटा दिसल्या
तेही रोजगारासाठी शेवटी
शहरात जाऊ लागले
लोकांविना आख्खं गाव
हळूहळू ओस पडू लागले
जागतिकीकरण , शहरीकरण आणि औद्योगिकीकरण
कारखान्यातील धुराच्या लोटात
ग्रामीण जीवनाचं मरणं
आता गावी जायचं झालं तरी
जायची इच्छा होत नाही
काँक्रिटीकरणाच्या विस्तारानं
गाव पूर्वीसारखं राहिलं नाही
तिथेही हल्ली वाट्टेल त्या
वस्तू विकत मिळतात
जिथं एक बस जाते तिथं
शिवशाही एसट्या धावतात
साखरसम्राट , गुंठेबहाद्दर
शाळा ,महाविद्यालयं काढतात
गावच्या वैराण जमिनीवर
एकराची उत्तुंग इमारत बांधतात
आता खरोखरच शहराला
गावाकडं ,
तरफडत येणं भाग पडतं
शहरातल्या चिकन्या तरुणाईला,
चरफडत शिकणं भाग पडतं
असं गुंतागुंतीचं ग्रामीण जीवन
आम्ही गावकरी जरी जगतो
तरी गावाचं नाव देशात गाजतंय
हे पाहून ऊर अभिमानानं फुुलतो
