एक कविता बापासाठी
एक कविता बापासाठी
एक कविता बापासाठी
बाप शेतात कष्टतो राबतो
मी त्याच्या जगण्यावर कविता लिहितो
मी वेचून घेतो मातीत सांडलेले घामाचे मोती
फेकून देतो कोऱ्या कागदावर
त्या थेंबानाच मग फुलतात शब्द
लोक त्यालाच कविता म्हणतात
बापाला आवडत नाही हे भीकेचे डोहाळे
म्हणतो, कविता करून पोट भरत नाही
खरं आहे त्याचं
पण कविताच मला लढण्याचं बळ देते
त्याच्या जगण्याचा संघर्ष मला अस्वस्थ करतो
मी कधीतरी एखादी कविता लिहितो
टाळ्या आणि वाहवा मिळवतो
सोशल मिडियावर लाईक्सची भीक मागतो
स्वतः ला कवी म्हणून मिरवतो
बाप रोजच कविता जगत असतो
कुणी त्याच्यासाठी कौतुकाचा शब्दही काढत नाही
बापाला त्याची गरजही वाटत नाही
तो पुन्हा कष्टाला जुंपून घेतो
नवी कविता जगण्यासाठी
महाकाव्य प्रसवण्यासाठी
