Sunjay Dobade

Tragedy Others

3  

Sunjay Dobade

Tragedy Others

अस्तित्व

अस्तित्व

1 min
11.6K


मी जपत आलोय खुणा

माझ्या आदिम अस्तित्वाच्या

आभाळाशी दोस्ती करणाऱ्या झाडांवर 

मी कोरलं होतं माझं नाव

मी शिकवली होती माझी भाषा 

रानावनातल्या पशुपक्ष्यांना

खळाळणाऱ्या झऱ्याला आणि

संथ वाहणाऱ्या नदीलाही ठाऊक होतं

माझं आदिम जीवन

काळ्या कभिन्न पहाडातही

उमटलं होतं प्रतिबिंब

माझ्या फौलादी छातीचं


आणि तुम्ही आलात

माझं अस्तित्व मिटवण्याचा चंग बांधून

तुम्ही सुरू केली झाडांची निर्घृण कत्तल

तुम्हीच उध्वस्त केलं माझं घरटं

माझे सगेसोयरे पशुपक्षी पळत सुटले

जीव घेऊन सैरावैरा

जिथे सुरु व्हायचा नदीचा प्रवाह 

तिथेच तुम्ही मांडला बाजार

तिच्या पावित्र्याचा


विकासाच्या नावाखाली

तुम्ही घेऊन आलात मोठमोठे बुलडोझर

बांधले रस्ते आणि खोदले बोगदे

आणि चिरडून टाकलं माझं अस्तित्व

हिरव्या डोंगरासहित


आता मला करावाच लागेल संघर्ष

माझं अस्तित्व टिकवण्यासाठी

आणि लिहावं लागेल माझे नाव

उत्तुंग आभाळावर !!!


Rate this content
Log in