STORYMIRROR

Sunjay Dobade

Others

4  

Sunjay Dobade

Others

शिकार

शिकार

1 min
4.1K


तुमच्या वाड्याच्या दरवाजावर

आणि भव्य दिवाणखान्यात

भिंतीवर टांगलेली

रानटी प्राण्यांची मुंडकी

वाढवतात तुमच्या वाड्याची शोभा

शिंगवाले हरीण-सांबर,


तीक्ष्ण सुळ्यांचे डुक्कर

आणि मोठ्या जबड्यांचे वाघ

देतात साक्ष तुमच्या पूर्वजांच्या मर्दपणाची

तुम्ही मोठ्या गर्वाने सांगता

तसबिरीतल्या पूर्वजांकडे बोट करून

हा आमचा अमुक अमुक

आणि ही त्याने केलेली शिकार


मी शोधत जातो त्या प्राण्यांमध्ये

माझ्या पूर्वजांचा आदिम चेहरा

किती हाल हाल करून तुम्ही मारलं त्याला

तुम्ही राबवलं त्याला जनावरासारखं

हिसकावली त्याची जमीन, घरदार

मुलगी आणि बायकोसुद्धा


पिळलं त्याला चरकातल्या उसासारखं

चोथा झाल्यावर फेकून दिलं उकिरड्यावर

तुम्हीच जाळलं त्याला घरादारासहित

त्याच्या मढ्यानेही दिली असती साक्ष

तुम्ही केलेल्या अमानुष छळाची

म्हणूनच कदाचित तुम्ही लावलं नाही ते

तुमच्या आलिशान दिवाणखान्यात


बरं झालं,

सरकारने आता शिकारीवर बंदी आणली

नाहीतर माझंही मुंडकंही टांगलं असतं

तुमच्या भव्य वाड्याच्या चौकटीवर


संजय दोबाडे, त्र्यंबकेश्वर

मोबाइल ९७६७६४९५४४


Rate this content
Log in