अजून कसे उजाडत नाही?
अजून कसे उजाडत नाही?
मी चालत आहे हा रस्ता
काळोखाने भरलेला
अजून कसे उजाडत नाही
ही हिंस्र श्वापदे वाटेवरती
बसली आहेत दबा धरून
डोळ्यात साठवून अनामिक दहशत
गुरगुरतात ती जीवघेणी
आजवर मी भीत आलो
त्यांच्या पोकळ गुरगुरण्याला
आता मुळीच मी डरणार नाही
हवी आहे थोडी सूर्याची सोबत
उजाडताच ही सारी पिलावळ
पसार होईल जंगलाच्या पल्याड
मीही शोधीन माझा निवारा
पण अजून कसे उजाडत नाही
मी नुकताच आभाळात
भरारी मारायला शिकलोय
माझ्या स्वप्नांना नुकतेच
पंख फुटू लागलेत
माझ्या पायाशी वळवळणारे
जहरीले साप
टपलेत माझे पंख छाटण्या
फुत्काराने जळते जंगल
मीही पळतो जीव वाचवून
पण आता मी डरणार नाही
त्यांच्या लवलवणाऱ्या जिभेला
हवी आहे थोडी सूर्याची सोबत
उजाडताच हे भयंकर नाग
बिळात आपुल्या जाऊन लपतील
मीही आभाळात मुक्त विहरेन
पण अजून कसे उजाडत नाही
