देई दान विद्येचे..!
देई दान विद्येचे..!
देई दान गे विद्येचे, आम्हा सरस्वती माते,
व्हावी तुझी कृपा इथे, सर्वांवरी..!
अज्ञानाची ही अवस, घोर पडला अंधार,
ज्ञानाचीगे चंद्रकोर, पाठव तू..!
तेजोमय क्रांती व्हावी, काळ रात ही सरावी,
सारी संकटे हरावी, या मुलखी..!
उजळावा खोपट्यात, लख्ख दीप ज्ञानाचा,
अंधकार अज्ञानाचा, दूर करी..!
ज्ञानयज्ञ होण्या पूर्ण, सेवा करण्या निष्काम,
घ्यावे ज्ञानसूर्य जन्म, घरोघरी..!
देई सामर्थ्य हातांना, ज्ञान वाटण्या बहुता,
कोणी उरेना मागुता, ज्ञानाविना..!
झोपडीत गरिबांच्या, तेलवाती शिक्षणाच्या,
ज्योती पेटवू ज्ञानाच्या, हृदयो हृदयी..!
येता लेखणी हातात, शेतकरी कामगारा,
मिळे सन्मान आदरा, तया जगी..!
काम होईल महान, ज्ञानतेज सर्वदूर,
गोरगरीब मजुर, होती ज्ञानी..!
येई चैतन्य घरात, हास्य पसरेल मुखी,
जग सार सुखी होई, ज्ञानामुळे..!
विद्याधन अंकुरता, कुंभ ज्ञानाचे उपजे,
पेरता शिक्षण बीजे, या भारती..!
वसा घेऊ क्रांतीज्योती, करू कार्य हे महान,
देऊ शिक्षणाचे दान, याहो तुम्ही..!
