चंद्र की प्रतिबिंब तिचे!
चंद्र की प्रतिबिंब तिचे!
श्यामल कांता, मनमोहिनी,
निरखून जलाशयात पाही,
चंद्रबिंब की प्रतिबिंब तिचे,
रूपगर्वितेस उमजत नाही!
घट भरताना, रजत तलावर,
अवचितपणे, सुधाकर दिसे!
नेत्र लोलूप, दृश्य ते मनोहर,
रमवून जीवाला लावते पिसे!
सलिलामध्ये पदर झिरपला,
कोमलांगीस हे भान न राही,
चित्त हरवून ती चित्तहरणी,
नजर कुपीतून कुतुहल वाही!
सांज शमली, रजनी आली,
ती चंचला, अचल बसलेली,
शशांक भुलवतो असा, त्या,
ललनेची प्रतिमा थिजलेली!