माय मराठीचा पोवाडा
माय मराठीचा पोवाडा


गणाधीश जो सर्व गुणांचा नमन पहिले त्यास करू,
गुणगान कराया माय मराठीचे शाहीर करी तयारी सुरू,
जी जी जी, जी ||
महाराष्ट्राची शान माझी सगुण,
नाकी नथ, डोईवर पदर,
भाळी कुंकू गळी डोरलं,
सौभाग्यवतीचे रूप सुंदर हो जी जी जी
हीची ख्याती अपरंपार,
साहित्य लेखणीची धार,
मर्दानी तरी सुकुमार,
मर्द मराठ्याची तलवार हो जी जी जी
गद्य- संतांनी भुषवलेली, अभंगातून आळवलेली, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी, परंपरांची खाण ख
री, किती करू कौतुके? मुंबईची मुबाई, विदर्भाची वनराई, कोकणची लाल माती, पंढरीची विठाई, किती करू कौतुके? इये मराठीचिये नगरी!
मराठमोळ्या मातीमध्ये तनमनाचे बीज रूजे,
अभिमान भाषेचा हृदयी वसतो, तेथे नाही कुणी दुजे,
जी जी जी र जी||
पोवाड्यात इतिहास सांगते,
लावणीत अशी श्रुंगारते,
नाट्यात रंगमंच गाजवते,
काव्यारसात शब्द पाझरते, हो जी जी जी...
वाणीवर तिजला सजवेन, आवडीने गुण गाईन,
शिवबांच्या या स्वराज्याची लेक म्हणवून घेईन,
जी जी जी र जी||