बाबा
बाबा
घरट्यावर पंख पसरून,
देई वटवृक्षाची छाया,
हृदयात दडलेली अबोल,
परी अपार, अनंत माया!
साधी रहाणी उच्च विचार,
अध्यात्माचे अवलंबन,
मदतीचा हात नेहमी पुढे,
जाणले आयुष्याचे मंथन!
सातासमुद्रापार गेलात,
नयनी खारे पाणी दाटले,
आधार सदा देत राहिलात,
उरी प्रेम कधी न आटले!
शब्द अपुरे पडतात.. याचे
कैसे करावे निरूपण?
परिवारासाठी केले तुम्ही,
जीवन सारे अर्पण!
आशिष असावेत, तुमच्या,
आदर्शांची करू अर्चना,
दीर्घायुष्य लाभावे बाबा,
हीच ईशचरणी प्रार्थना!