सीता हरण
सीता हरण
पंचवटीत श्रीराम, जानकी,
लक्ष्मण, होते वनवास भोगत
एके दिवशी रावण भगिनी
शुर्पणखा आली तिथे फिरत!
पाहताच श्रीरामास अशी,
मोहित झाली ती सत्वरी,
विनविले, 'वरले तुम्हास,
कृपा तव करावी मजवरी!'
श्रीराम वदले, 'मी एकपत्नी,
एक वचनी, कसे स्विकारावे?
माझा भ्राता लक्षण इथे,
त्यास प्रस्ताव विचारावे!'
लक्ष्मणाचे बोल ऐकूनी,
शुर्पणखेने अपमान मानला,
क्रोधित होऊन धावली,
सीतेवर करण्यास हमला!
अवधान राखून लक्ष्मणाने,
शीघ्रतेने नाकावर केला वार,
शुर्पणखा ओरडत, विव्हळत
भ्रातांसमोर मांडला हाहाकार!
कुटील विचार करी रावण,
ऐकून सीतेचे लावण्य वर्ण,
मारिचास धाडले, मोहविण्या,
सीतेस बनून मृग सुवर्ण!
सीता इच्छेसाठी, रामा-लक्ष्मण,
जाता वनी मृग तो मारायला,
संधी साधून रावण योगी बने,
येई कुटीत भिक्षा मागायला!
लक्ष्मणरेखा पार करून ती,
जानकीने मर्यादा ओलांडली,
हृदयद्रावक प्रसंग घडला असा
तेव्हा रावणाने सीता हरली!
