भेट-एक गंमत
भेट-एक गंमत
लाल साडीतील रुपगर्विता
श्र्वेतांबरीच्या प्रेमात पडली
पदर तिचा धरण्यासाठी
जीव घेऊन धावत सुटली
घसट करुन एकतर्फी
घट्ट मिठी मारती झाली
श्र्वेतांबरी मुरकून थांबली
नि जिवाशिवाची गाठ पडली
रस्त्यावरची रहदारी थांबली
विलक्षण दृश्य पाहण्यात रंगली
समाधीभंग करण्यासाठी
बालमेनका मग सरसावली
पण हाय ! पाय तिचा अडकला
श्र्वेतांबरीच्या घोळात लपला
समाधी तर भंगलीच नाही
पण गुंता आणखी गुंतत गेला
आता इतरांची गुंगी उतरली
खडबडून जाग आली
शिट्यांवर शिट्या, हाॅर्नवर हाॅर्न
वाजू लागले कर्णकर्कश्य आवाजात
आता मात्र जाग आली
दोघींची लाजून मुरकुंडी वळली
तरीही मिठी सोडवेना
जणुं युगायुगांच्या विरहाची
शेवटी पांढरा डगला सरसावला
हातवारे करू लागला
पट्टीची भाषा बोलू लागला
घुर्र--फुर्र आवाज झाला नि------
अखेर कोंडी फुटली
श्र्वासाला वाट सापडली
दृढ मिठी सैलावली
अचानक कोडे सुटल्यागत----
' Best ' ची लालराणी अन्
खाजगीवाल्यांची धवलांगी
दोघीही मार्गस्थ जाहल्या
एकमेकींकडे वळूनही न पाहता
कुठे काही घडल्याची
एकही खूण मागे न ठेवता !
