भिशी
भिशी


दिवस उजाडता बायकोच्या
भिशीची कुणकुण लागली ;
"घर स्वच्छ करा " अशी
भुणभुण सुरू झाली.
" बर्म्युडावर बागडू नका "
बायकी हुकूमनाम सुटला ;
गुपचूप बेडरूममध्ये जाऊन
झब्बा पायजमा घातला.
हसत खिंकाळत छप्पर फाडत
साळकाया- माळकाया उगवल्या ;
स्वादिष्ट शिरा-पोहेंवर मनसोक्त
पसरून ताव मारू लागल्या.
एकेका नावाच्या चिठ्ठ्या
टेबलावर फेकल्या गेल्या ;
आंजारत-गोंजारत मग
विजेतीच्या अभिनंदनात गुंतल्या.
अवाढव्य देह सावरत
एकेक घराबाहेर पडल्या ;
पी-पी आवाज करत
दुचाकी जागीच हलल्या.
एकदाची भिशी पार पडली
बायको प्रसन्नतेने लोळली ;
माझी आठवण येता पसारा
आवरण्या बोलावू लागली.