भाषा आमची मराठी
भाषा आमची मराठी
माझ्या माय मराठीची
गोडी अवीट रसाळ
तिचे लावण्य पाहता
झाली इंग्रजी घायाळ
माझ्या मराठीचे रूप
आहे राकट ॉरांगडे
इंग्रजीचा शब्दसाठा
तिच्यापुढे थिटा पडे
भाषा आमची मराठी
असे खाण लावण्याची
डफावर थाप, ओठी
ललकार पोवाड्याची
तिच्यापाशी आहे खरे
शब्द सौंदर्य भांडार
करी सांत्वन मायेने
कधी फुलवी अंगार
भाषा आमची मराठी
नव रसांनी भरली
संस्कृताच्या जवळची
सर्व भाषांत ठरली
भाषा आमची मराठी
असे खाण लावण्याची
डफावर थाप, ओठी
ललकार पोवाड्याची
अक्षरांच्या कोंदणात
भाषा मराठी सजते
ममत्वाची दुग्धधार
प्रेम पियुष पाजते
