भाग १ - हुशार म्हातारी चल रे भोपळ्या टुणूक टुणूक
भाग १ - हुशार म्हातारी चल रे भोपळ्या टुणूक टुणूक
एक होती म्हातारी
रहात होती एका गावी,
लेकीचं तिच्या नाव सावी
रहात होती दुसऱ्या गावी.
म्हातारी मनात म्हणते कशी
सावीकडे जाउन येते
भेटली नाही बरेच दिवस
हाल हवाल पाहून येते
दुसऱ्या दिवशी सकाळी
आपली म्हातारी निघाली
रस्ता होता जंगलातून
म्हातारी एकटीच होती त्यातून
म्हातारी होती भित्री जरी
हुशार पण होती खरी
झाडामागून आवाज आले
वाघोबानी दर्शन दिले
अग अग म्हातारे कुठं चाललीस
थांब थांब जरा मला भूक लागली
खाऊन टाकतो आता तुला
नंतर काम आहे मला
अरे अरे वाघोबा आता जरा थांब
जायचंय मला खूप लांब लांब
दुसरं काम तू उरकून घे
आता मला जाऊ दे
लेकीकडे मी जाऊन येते
गोड धोड खाऊन येते
धष्ट पुष्ट होऊन येते
मग तुझं जेवण होते
म्हातारी गेली सावीकडे
खाल्ले तूप रोटी वडे
जाड जूड चांगलीच झाली
परत जायची वेळ आली
म्हातारीने विचार केला
लेकीकडून भोपळा घेतला
भोपळ्यात बसली म्हातारी
निघाली परत आपल्या घरी
जंगलामधून जाणे झाले
भोपळ्या समोर वाघोबा आले
अग अग म्हातारे आता तरी थांब
खाऊ दे मला ,जाऊ नको लांब
भोपळा म्हणतो वाघोबाला
का म्हातारी म्हणतोस मला
कोण रे म्हातारी मला नाही ठाऊक
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक
वाघोबा बसले हात चोळत
म्हातारीची वाट पाहत
म्हातारी निसटली देऊन तुरी
शक्ती पेक्षा युक्ती बरी
