बैल पोळा
बैल पोळा
अमावस्या श्रावणाची
आली घेऊन सणाला
कृषीवल आनंदाने
सजवितो हो बैलाला..१
बैल धुवून प्रेमाने
खांदा मळणी तेलाने
मनोमन आठवतो
काम केलेले बैलाने..२
शिंगे रंगवतो धनी
गोंडे झुंबर शिंगाला
बांधे बाशिंग सुंदर
गळा घुंगराच्या माला..३
अंगावर पांघरतो
झूल सुंदर नक्षीची
तिला आरसे कवड्या
शोभा वाढविते तिची..४
बैल सजला धजला
देवा पुढं उभा केला
त्याला वाजत गाजत
घरी मिरवत नेला..५
घरा मधली गृहिणी
पूजा बैलाची करते
भाव भरल्या हृदयी
पंचारती ओवाळते..६
पान विडा कृषिवला
टिळा कपाळी लावते
घास पुरण पोळीचा
बैलामुखी भरविते..७
देवा नाही मजा येत
बैला शिवाय शेतीला
नाही मिळत सुगंध
कष्टा शिवाय मातीला..८
