बायको माझी
बायको माझी
बायको माझी लै लै गुणी
काय सांगू माझी कहाणी।।धृ।।
रोज सकाळी, लई येरवाळी,
चहा करून मागते।
नाही दिला, तर डोळे वटारून,
रागानेच बघते।
गुरगुरते वाघिणी वाणी।।१।।काय..
अंगण झाडून, कचरा काढून,
बसतो मी रांगोळीला।
बायको माझी, ओरडून सांगे,
पाणी द्या अंघोळीला।
आंघोळीचे काढतो पाणी।।२।।काय..
न्हाऊन धुवून न्हाणी घरातून,
जेव्हा बाहेर येते।
साडी, चोळी, पावडर लाली,
जागेवरच लागते।।
करतो तिची वेणी फणी।।३।।काय..
स्वयंपाक करतो, टिफिनही भरतो,
ऑफिसला मी निघतो।
बायकोसाठी भाजी नि पोळी,
ताट करून ठेवतो।।
थाटानेच जेवते राणी।।४।।काय..
वेळ संपता, काम आवरतो,
ऑफिस जेव्हा सुटते।
देवा शप्पथ, घरी जायला,
नको मला वाटते।।
निघतो मान खाली घालूनि।।५।।काय..
घरी आल्यावर स्वैपाक जेवण,
भांडी कुंडी घासतो।
आवरून सारे, झाडून पुसून,
अंथरूण ही घालतो।।
चेपतो पाय सेवका वाणी।।६।।काय..
अधाशावाणी, बायको मी केली,
माझ्या मामाची पोर।
दुःखात घातला, जीव सुखाचा,
जीवाला लागला घोर।।
चूक करू नका 'पंडिता' वाणी।।७।।
काय सांगू माझी कहाणी।।
